श्री क्षेत्र माणगांव हे सिंधूदूर्ग जिल्ह्यात कुडाळपासून १४ किमी अंतरावर आहे. श्री दत्तात्रेयांचे प्रात:स्मरणीय चतुर्थावतार श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींची जन्मभूमी. याभूमीने श्री टेंबे स्वामी महाराज व त्यांचे बंधू सिताराम स्वामी असे दोन सत्पुरुष आपणास दिले.

श्री. वासुदेवशास्त्री नरसोबाच्या वाडीहून येतांना श्री दत्तप्रभूंच्या इच्छेने कागल येथे दत्त महाराजांची द्विभूज वरांहकर अशी मूर्ती त्यांना देण्यात आली. स्वामी महाराजांनी साक्षात श्री दत्तप्रभुंच्या आज्ञेने स्वत: श्रम करुन सात दिवसांत मातीचे छोटेसे मंदिर बांधून वैशाख शु. ५ शके १८०५ रोजी श्री श्री दत्तप्रभूची स्थापना केली. या मंदिरात साक्षात श्री दत्तप्रभू सात वर्षे राहिले व आत्ताही चैतन्यरुपात येथे राहत असल्याने अनन्यभावे शरण येणा-या भक्तांना त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात. माणगांवला भूवैकुंठ असे संबोधतात.
त्यांच्या शिष्या कै. अ. सौ. श्रीमंत महाराणी इंदिराबाई होळकर ( इंदौर, मध्यप्रदेश ) यांनी मंदिराचा जीर्णोध्दार वैशाख शु. १३ शके १८६० ( ता. १२ मे १९३८ ) रोजी करुन श्री दत्तप्रभूंच्या मूर्तिची पुन:प्रतिष्ठापना केली. या मंदिराची रचना हेमाडपंथीय आहे. आपण जेथे आहात तेच हे प्रसिध्द श्री दत्तमंदिर

नंतरच्या काळात हळूहळू सदर मंदिराचे जीर्णोद्धाराचे कार्य ट्रस्ट तर्फे करण्यात आलेले आहे. या मंदीराच्या प्रदक्षणेच्या मार्गात दोन्ही बाजूस १-१ असे दोन लाकडी खांब आहेत ते स्वामी महाराजांनी अभिमंत्रीत केलेले आहेत. त्यांच्या केवळ स्पर्शाने कुठल्याही प्रकारच्या बाधेचे निरसन होते. आज त्या मंदीरातच श्री वासुदेवानंद सरस्वतींचीही मूर्ती ठेवण्यात आली आहे. येथे संस्थान मार्फतच दत्तभक्तांना अभिषेक, पालखी, अन्नदान व जीर्णोद्धार या सारख्या सेवांमध्ये अर्थदानाने संमिलीत होता येते.

श्री. प. प.वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराजांनी श्री दत्तमंदिर स्थापन केलेपासून या पादुका पूजेस आहेत. श्री दत्तमंदिरच्या गर्भगृहात नित्य अभिषेकांस या पादुका असतात.

सौ.अन्नपूर्णा माता भवन : नंतर या संस्थेने २००७ ते २०१० या कालावधीत या ठिकाणी भव्य इमारत बांधली. या इमारतीमध्ये संगणकीकृत कार्यालय, तळमजला व पहिल्या मजल्यावर सुसज्ज स्वयंपाकगृह, अन्नदानाकरिता सुसज्ज भव्य हॉल बांधला आहे. या इमारतीला श्री. प. प. टेंब्ये स्वामी महाराजांच्या पत्नीचे नाव म्हणून सौ. अन्नपूर्णामाता भवन असे नाव दिले आहे.

श्री दत्तमंदिर पहाटे ५.४५ ते रात्रौ ९.०० पर्यंत सुरु असते. आरती दुपारी १२.३० ते १२.४५ व सांयकाळी ७ ते ७.२० पर्यंत दररोज असते. श्रीं चे जन्मस्थान सकाळ ६ ते रात्रौ ८ पर्यंत सुरु असते.  अन्नदान विभाग दुपारी १ ते २ व रात्रौ ८ ते ८.३० पर्यंत दररोज सुरु असते. ग्रहणकाल व वेधकाळात मात्र अन्नदान विभाग बंद राहिल.

This Post Has One Comment

  1. शिवराम काणेकर

    नमस्कार.
    वेबसाईट छान आहे.

Leave a Reply