प. प. श्री. टेंब्ये स्वामी महाराजांची एक रचना संपूर्ण जगात अतिशय प्रसिद्धी पावलेली आहे. प्रत्येक दत्तभक्त दररोज ही रचना म्हणतोच म्हणतो. त्यांची ही सुप्रसिद्ध रचना म्हणजेच ‘ करुणात्रिपदी ‘ होय!

श्रीक्षेत्र नरसोबाचीवाडी ही श्रीदत्तप्रभूंची राजधानी मानली जाते. या स्थानावर भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे बारा वर्षे वास्तव्य झालेले आहे. त्यांच्या ‘मनोहर पादुका’ कृष्णा काठावरील औदुंबर वृक्षाखाली स्थापित असून सर्व दत्तभक्तांचे हे अतीव प्रेमादराचे स्थान आहे. या वाडीच्या नित्यपूजेची व उत्सवांची सर्व पद्धत आणि आचारसंहिता-नियमावली स्वत: प. प. श्री. टेंब्ये स्वामींनीच घालून दिलेली आहे. तेथील परिपाठानुसार चातुर्मास्यातील आषाढ पौर्णिमा ते दसरा हा अडीच महिन्यांचा काळ सोडता उर्वरित वर्षभर दररोज संध्याकाळी वाडीला श्रींची पालखी प्रदक्षिणा असते.

इ.स.१९०५ मध्ये एकेदिवशी वाडीला पालखी प्रदक्षिणा सुरू असताना, पुजारी गुंडोपंत खोंबारे यांच्या हातून श्रींची उत्सवमूर्ती पालखीतून खाली आली. हा भलताच अपशकुन पाहून सगळे घाबरले. नक्कीच भविष्यात काहीतरी संकट येणार असून त्याचीच ही पूर्वसूचना आहे, असे जाणून ते सगळे पुजारी हवालदिल झाले. त्यावेळी प. प. श्री. टेंब्ये स्वामी हिंगोली जिल्ह्यातील नरसी (नामदेव) येथे चातुर्मास्यानिमित्त वास्तव्याला होते. तेथे पुजारी मंडळी त्यांना भेटायला गेली. पुजारी मंडळींच्या तोंडून सर्व हकीकत ऐकल्यावर प. प. श्री. टेंब्ये स्वामी ध्यानाला बसले.

ध्यानात त्यांनी श्रीदत्तप्रभूंना कारण विचारले, त्यावर देव क्रोधाविष्ट होऊन म्हणाले, “तू घालून दिलेल्या नियमांनुसार हे लोक वागत नाहीत, पादुकांवर अशुद्ध पदार्थ घालतात, तुझी निंदा करतात. आम्हांलाच तेथे राहायचा कंटाळा आलाय. पंच नेमून परभारे व्यवस्था करावी !” ध्यानातून उठल्यावर प. प. श्री. टेंब्ये स्वामींनी पुजा-यांना रोषाने सांगितले की, “जर दुर्वर्तन सुधारून श्रींची योग्य प्रकारे सेवा करणार नसाल तर काय भयंकर परिणाम होतील ते आम्ही सांगू शकत नाही. तुम्ही आपले वर्तन सुधाराल तर ठीक, नाहीतर तुम्ही जाणे आणि तुमचे देव जाणे !” पुजा-यांनी हात जोडून पुन्हा पुन्हा क्षमा मागितल्यावर व नीट वागण्याची, जशी घालून दिली आहे त्याबरहुकूम सेवा करण्याची हमी दिल्यावर प. प. श्री. टेंब्ये स्वामींनी कळवळा येऊन भगवान श्रीदत्तप्रभूंची प्रार्थना केली. त्याचवेळी त्यांनी ही तीन पदांची करुणात्रिपदी रचून ती दररोज प्रार्थनापूर्वक म्हणण्याची पद्धत घालून दिली. आजही दररोज पालखीच्या तिस-या प्रदक्षिणेला तीन थांब्यांवर ही त्रिपदी म्हटली जाते.

श्रीकरुणात्रिपदी

पद पहिले

शांत हो श्रीगुरुदत्ता। मम चित्ता शमवी आतां।।ध्रु०।।
तूं केवळ माता जनिता। सर्वथा तूं हितकर्ता।।
तूं आप्तस्वजन भ्राता। सर्वथा तूचि त्राता।।
(चाल) भयकर्ता तूं भयहर्ता। दंडधर्ता
तूं परिपाता। तुजवाचुनि न दुजी वार्ता।
तूं आर्ता आश्रय दत्ता।। शांत हो श्रीगुरुदत्ता. ।।१।।

अपराधास्तव गुरुनाथा। जरि दंडा धरिसी यथार्था।।
तरि आम्ही गाउनि गाथा। तव चरणीं नमवूं माथा।।
(चाल) तूं तथापि दंडिसी देवा। कोणाचा
मग करूं धावा? सोडविता दुसरा तेव्हां।
कोण दत्ता आम्हां त्राता? शांत हो श्रीगुरुदत्ता. ।।२।।

तूं नटसा होउनि कोपी। दंडितांहि आम्ही पापी।
पुनरपिही चुकत तथापि। आम्हांवरि नच संतापी।।
(चाल) गच्छतः स्खलनं क्वापि। असें मानुनि नच हो कोपी। निजकृपालेशा ओपी।
आम्हांवरि तूं भगवंता।। शांत हो श्रीगुरुदत्ता. ।।३।।

तव पदरीं असता ताता। आडमार्गीं पाऊल पडतां।
सांभाळुनि मार्गावरता। आणिता न दूजा त्राता।
(चाल) निजबिरुदा आणुनि चित्ता। तूं पतीतपावन दत्ता। वळे आतां आम्हांवरता।
करुणाघन तूं गुरुनाथा।। शांत हो श्रीगुरुदत्ता. ।।४।।

सहकुटुंब सहपरिवार। दास आम्ही हें घरदार।
तव पदी अर्पुं असार। संसाराहित हा भार।
(चाल) परिहरिसी करुणासिंधो। तूं दीनानाथ सुबंधो। आम्हां अघलेश न बाधो।
वासुदेव प्रार्थित दत्ता।। शांत हो श्रीगुरुदत्ता.।।५।।


पद दुसरे

श्रीगुरुदत्ता जय भगवंता। तें मन निष्ठुर न करी आता।।ध्रु०।।
चोरें द्विजासी मारीतां मन जें।
कळवळलें तें कळवळो आतां।। श्रीगुरुदत्ता।।१।।

पोटशूळानें द्विज तडफडतां।
कळवळलें तें कळवळो आतां।। श्रीगुरुदत्ता।।२।।

द्विजसुत मरता वळलें तें मन। हो कीं
उदासीन न वळे आतां।। श्रीगुरुदत्ता।।३।।

सतिपति मरता काकुळती येतां। वळलें तें
मन न वळे कीं आतां।। श्रीगुरुदत्ता।।४।।

श्रीगुरुदत्ता त्यजि निष्ठुरता। कोमल
चित्ता वळवी आतां।। श्रीगुरुदत्ता।।५।।


पद तिसरे

जय करुणाघन निजजनजीवन। अनसूयानंदन पाहि जनार्दन।।ध्रु०।।
निजअपराधें उफराटी दृष्टी। होउनि पोटीं भय धरूं पावन।।१।।जय०।।
तूं करुणाकर कधीं आम्हांवर। रुसशी न किंकर-वरदकृपाघन।।२।।जय०।।
वारी अपराध तूं मायबाप। तव मनीं कोपलेश न वामन।।३।।जय०।।
बालकापराधा गणे जरी माता। तरी कोण त्राता देईल जीवन।।४।।जय०।।
प्रार्थी वासुदेव पदिं ठेवी भाव। पदीं देवो ठाव देव अत्रिनंदन।।५।।जय०।।


श्री गुरुमुर्ती चरित्रात करुणा त्रिपदीचे महत्व काय आहे ह्याचे सर्व भाविकांना अतिशय उदबोधक असे वर्णन दिसुन येते. मंत्ररुप प्रसादीक व दत्त भक्तांस प्रत्यक्ष प्रमाण असणार्‍या ह्या श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती यांच्या वरद चरित्र ग्रंथात ओवी क्रमांक ४० ते ५३, अध्याय ९२ ह्यात करुणा त्रिपदीचे महत्व विशद केले आहे. ह्याचा संक्षिप्त भावार्थ असा :-
काही आपत्ति येता जो नित्य एकविस वेळा श्रध्दायुक्त अंतःकरणाने, मनात कोणती ही शंका न आणता ह्या त्रिपदीचे पठण करेल त्याच्या आपत्ति चे पुर्ण निरसन होइल. तसेच पुर्ण श्रध्दावंत अंत: करणाने जो ह्या त्रिपदीचे एक वीस वेळा श्रवण करेल त्याची व्याधी दुर होऊन तो निरोगी होईल व त्याला व्यथामुक्ती लाभेल. भक्तांसाठी करुणा त्रिपदीचे हे तत्कलिक फळ निवेदन केले आहे. परंतु सौख्य व सदगुरुक्रुपा ह्यांचा लाभ होण्यासाठी भक्तांनी नित्य नियमाने सर्वकाळ ह्या त्रिपदी पाठाने दत्तगुरुंचे स्तवन करावे.

Leave a Reply

12 − 12 =