श्री. प. प. टेंब्ये स्वामींचे बहुतांश हस्तलिखित वाङमय त्यांचे पट्टशिष्य श्री. प. प. नृसिंह सरस्वती दिक्षित स्वामी महाराज औरवाड ( अमरापूर ) येथें जपून ठेवले होते. त्यांनी “ श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती पीठ” या संस्थेची स्थापना औरवाड येथे केली.

प. पू. श्री. वामनरावजी गुळवणी महाराज यांनी त्यांचेकडे जाऊन त्यांचे हस्तलिखित ग्रंथावरुन प. पू. श्री. दत्तमहाराज कविश्वर यांचे सहाय्याने श्री. प. प. टेंब्ये स्वामींच्या जन्मशताब्दीनिमित्त समग्र वाङमयाचे ग्रंथरुपात १२ भागांत प्रकाशन केले. त्याचवेळी प. पू. गुळवणी महाराजांनी टेंब्ये स्वामींची एक अखिल भारतीय संस्था असावी असा विचार ५० वर्षापूर्वी मांडला होता.

त्यांच्या या विचारांचे ध्यान ठेवून मननपूर्वक, पुण्याचे श्री. वासुदेव निवासचे अध्यक्ष प. पू. श्री. नारायणकाका ढेकणे महाराज यांनी पुढाकार घेऊन इतर सर्व भक्तांच्या सहकार्याने दि. १९ ऑक्टोबर २००२ कोजागिरी पौर्णिमा या शुभ दिवशी श्री स्वामी महाराजांचे समाधी क्षेत्र गरुडेश्र्वर गुजराथ येथे भारतातील प्रमुख श्री दत्तसंस्थानचे प्रतिनिधींच्या उपस्थितीत श्री. प. पू. नारायणकाका ढेकणे महाराज व अवधूत निवास ट्रस्ट, नारेश्र्वरचे अध्यक्ष प. पू. डॉ. धीरुभाई जोशी यांचे मार्गदर्शनाखाली “श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज प्रबोधिनी” ची स्थापना केली.

त्यावेळी प्रबोधिनीचे प्रमुख उद्देश खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत.

  • श्री. प. प. टेंब्ये स्वामी महाराजांच्या सर्व ग्रंथांचे प्रकाशन करणे.
  • या ग्रंथांचे विविध भाषेत अनुवाद करणे.
  • संगणक , इंटरनेट, वेबसाईट इ. आधुनिक माध्यमांद्वारे महाराजांचे जीवनकार्य व साहित्याचा प्रसार करणे.
  • श्री. टेंब्ये स्वामी महाराज विरचित ग्रंथांचे अध्ययन, संशोधन यासंबधी विद्यापीठ तसेच महाविद्यालयांना प्रोत्साहित करणे. यासंबधी त्यांना मार्गदर्शन करणे. या सर्व गोष्टींमुळे महाराजांच्या साहित्याचा समावेश अभ्यासक्रमात होऊ शकेल.
  • या प्रबोधिनीत जास्तीत जास्त दत्तसंस्थानांना समाविष्ट करुन घेणे. महाराजांच्या साहित्याचे प्रकाशन, प्रसार, वितरणामध्ये सहाय्य करणे. या सर्व दत्तसंस्थानशी मैत्रीपूर्व संबंध ठेवून सर्व स्थानांचा एकमेकांच्या सहकार्याने विकास करणे.
  • महाराजांचे भ्रमण आसेतूहिमाचल झालेले आहे. ज्या स्थानांवर महाराजांचा चातुर्मास झालेला आहे, निवास केलेला आहे, ती ती स्थाने विकसित करणे. त्याठिकाणी महाराजांचे स्मारक बांधणे. दैनंदिन पूजा अर्चेची व्यवस्था करणे. महाराजांचे वाङमय, तत्वज्ञान, उपदेशाचा प्रसार करणे.