मुंबई येथील श्री. तालचेरकर यांच्या भाचीचा विवाह इंदौरचे राजपुत्र तुकोजीराव होळकर यांचेशी निश्चित केलेला होता. परंतू ते इंग्लंडला निघून गेले. त्यांनी सहा महिने झाले तरी जराही चौकशी केली नाही. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या तालचेलकरानी आपल्या भाचीला महाराजांच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र नृसिंहवाडीला आणले. दत्तात्रय पुजा-यांसह त्यांनी महाराजांचे दर्शन घेतले. इंदिराजींची जन्मपत्रिका महाराजांकडे देऊन त्यांनी सविस्तर प्रकार त्यांना कळविला. श्री महाराजांनी जन्मपत्रिका बघताच या पत्रीकेत राजयोग नाही तर हा विवाह कसा होईल असे विचारले. हे ऐकून इंदिरा आणि मामी चिंताग्रस्त झाले.

परंतु पुजारी बरेच विवेकी आणि चतुर होते. ते म्हणाले,’महाराज, आपल्या हातात दिली पत्रिका असताना असा योग का असणार नाही? राजवैभवाचा योग असो अथवा नसो पण आपल्या कृपेने राजयोगच मिळावा असे आपण करावे.” म्हणून महाराजांनी इंदिराजींना “इंद्रायणि नमस्तुभ्यं…” हा मंत्र दिला आणि त्याचा रोज एकाग्रतेने आणि श्रध्देने जप करण्यास सांगितले. हा मंत्र जप सुरु केल्यानंतर त्या जपाचे एक महिन्यात फळ मिळाले.म्हणजेच श्री तुकोजीरावांचे पत्र आले,आणि ते लवकरच परत हिन्दुस्थानात आले आणि त्या दोघांचा विवाह झाला. अशी महाराजांची कृपा असते हे ऐकून मनाला अत्यानंद होतो आणि या प्रसंगाने इंदिराराणीसाहेब महाराजांची निःसिम भक्त झाली.

या नंतर त्या दरवर्षी महाराजांच्या दर्शनासाठी माणगांवात येत असे. तिथे त्या अंगण झाडणे,सारवणे या सारखी सेवा करत होती. महाराणी झाल्यानंतर सुद्धा त्या मनःपूर्वक मंदिराची व्यवस्था पहात असत. त्यानीच श्रीदत्तमंदिराचा जिर्णीध्दार करुन वैशाख शुक्ल त्रयोदशी शके १९६० (१३ मे १९३८) या दिवशी श्री दत्त महाराज, श्री देवी सरस्वती, श्री आद्य शंकराचार्य आणि श्री.प.प.वासुदेवानंद सरस्वती या मूर्तींची काशीचे प. प. ब्रह्मानंद स्वामी यांच्या हस्ते मूर्तीप्रतिष्ठापना केली.

श्री स्वामी महाराजांचे समाधी स्थान गरुडेश्वर येथेही दरवर्षी इंदिराबाई जात असत. त्या ठिकाणीही त्यांनी विश्वस्त मंडळ स्थापन केले. तसेच नर्मदा नदीवर घाट बांधला. तिथल्या विश्वस्त मंडळाचा कारभार बघूनच श्री दत्तमंदिर माणगांव येथेही विश्वस्त मंडळ स्थापन करण्यास सांगितले. त्या वेळी गरुडेश्वरचे विश्वस्तांपैकी डॉ.रणजीत भाई भट्ट – सुरत, डॉ.कन्हैयालाल वाणी – अहमदाबाद, वैद्यराज रमेशचंद्र पटवर्धन, श्री कोरांन्ने आणि मुरलीधर जोशी – बडोदा, या सगळ्यांनी १९५८ मध्ये येऊन माणगांव दत्तमंदिराची स्थिती पाहिली.

त्यानंतर ते विश्वस्त इंदौरला जाऊन महाराणी इंदिराबाई होळकर यांना भेटले आणि त्यांनी माणगांव दत्तमंदिराच्या व्यवस्थेबद्दल सांगितले. तसेच माणगांव दत्तमंदिरची व्यवस्था चालवण्यासाठी निधी नसल्यामुळे विश्वस्त मंडळ तयार करुन काय करावे असे विचारले. हे ऐकून महारानींनी ताबोडतोब २२,००० (बावीस हजार रुपयांचे शेअर्स श्री.प.प.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरणी ठेवून विश्वस्त मंडळाच्या स्वाधीन केले आणि त्यांना आपण लवकरात लवकर माणगांवी जाऊन त्याठिकाणी विश्वस्त मंडळ स्थापन करुन या रुपयांच्या व्याजात व्यवहार सुरु करण्याची विनंती केली.

त्यानुसार डॉ.रणजीत भाई भट्ट आणि वैद्य पटवर्धन साहेब यानी विश्वस्त नोंदणी कार्यालय मुंबई या ठिकाणी दिनांक १३ मे १९६१ या दिवशी “ श्री दत्त मंदिर माणगांव ” या नावाने मंडळाची नोंदणी केली. त्यानंतर दरवर्षी गरुडेश्वरचे विश्वस्त माणगांव याठिकाणी येऊन स्थानिक विश्वस्त मंडळाचा कारभार पाहात असत. कै. विष्णू पांडुरंग माणगांवकर आणि कै. वैद्य जनार्दन श्रीपाद गणपत्ये यांच्या विनंतीनुसार मुंबई स्थित नानेली गावचे सुपुत्र तसेच स्वामी भक्त कै.श्री.पांडुरंग जिवाजी खांडाळेकर ( आरोंदा निलगिरी तेल – उत्पादक ) यांनी येथे येणा-या भक्तांना निवासासाठी ५ खोल्या बांधून दिल्या.

यानंतर विश्वस्त मंडळाने स्थानिक कमिटी नेमली. त्यामध्ये कै. वैद्य जनार्दन श्रीपाद गणपत्ये, कै. मोहनराव रांगणेकर व श्री. कमलाकर विश्वनाथ साधले ( मनोहर भाऊ ) असे तिघेजण होते. या स्थानिक कमिटीने नंतर दर गुरुवारी आरती, प्रदक्षिणा, पालखी इ. उपासनांना सुरुवात केली. पालखी दरमहा वद्य पंचमीला ( प. प. स्वामी महाराजांच्या जयंती तिथीदिनी ) काढण्यात येऊ लागली. ( चार्तुमास सोडून ) या पालखी सोहळ्याला शिबिकोत्सव असे म्हणतात. ( शिबिका – पालखी ). स्थानिक कमिटीने व परिसरातील ब्रह्मवृंद व गावातील भक्तांना घेऊन श्री दत्तमंदिराभोवतालची जमीन करणे, अंगण करणे, पेळा करणे, सारवणे, उत्सवांसाठी मंडप घालणे आदि विविध कामे सर्वांच्या सहकार्यांने पार पाडीत असत. यासाठी तसेच तेल, दिवा उ. साठी ५० पैसे मात्र ( आठ आणे ) वर्गणी म्हणून दर महिन्याला काढत असत.

श्री दत्त मंदिर जीर्णोध्दाराच्या ( वैशाख शुध्द १३ ) वाढदिवसाच्या आधी सात दिवस त्यानिमित्ताने गावातील भक्तमंडळी व ब्रह्मवृदांच्या सहकार्याने स्थानिक कमिटीने “ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ” या मंत्राचा अखंड नामसप्ताह सुरु केला. या उत्सवानिमित्त गावातून भिक्षा मागून आठव्या दिवशी भंडारा ( समाराधना ) केला जात असे. या कामामध्ये वरील स्थानिक कमिटामधील सदस्यासोंबत स्वामी पाडगांवकर, नारायणराव भोसले, शंकर तामाणेकर, भिसे, काणेकर, साबा धुरी, बाबू धुरी, इ. गावकर मंडळी, दाजी मेस्त्री, कुडतरकर, कोरगावकर, भर्तू, भिसे, पेडणेकर इत्यादी बाजारकर मंडळी तसेच तळीवाडीवरील भक्तजण या अखंड नामस्मरणीय सप्ताहात मोलाचा वाटा उचलत.

इ.स.१९७० पासून प.पू.श्री.नांदोडकर स्वामी येथे येऊ लागले. त्यांनी श्री दत्त मंदिराच्या कळसावर सोन्याचा कळस बसविला. तसेच श्रीं च्या जन्मस्थानी श्रीं च्या पादुकांची स्थापना केली. ते दरवर्षी एका यज्ञाचे आयोजन करीत असत.त्यामुळे या ठिकाणी भक्त गणांची रीघ वाढली.तसेच त्यांनी भिक्षा मागून जुन्या धर्मशाळेचा जीर्णीध्दार करुन वैशाख शुक्ल सप्तमी इ.स.१९७६ मध्ये वास्तुशांती केली.त्यानंतर येथील स्वत:चे कार्य पूर्ण करुन दुस-या दिवशी ते वैकुंठवासी झाले.

इ.स.१९७७ सालापासून दरवर्षी एका यज्ञाचे आयोजन केले जाते. गेल्या काही वर्षांपासून गुरुप्रतिपदेचे निमित्त साधून माघ महिन्यात तीन दिवसांचा यज्ञोत्सव साजरा केला जातो. त्यामधे हजारो भक्त सहभागी होतात.या संस्थेचे अध्यक्ष श्री. विठ्ठल यशवंत उर्फ आबाजी बांदेकर यांच्या प्रेरणेने आणि योगदानाने या संस्थेची बरीच सुधारणा होत आहे. १९९६ मध्ये २१ खोल्यांचा भक्तनिवास बांधण्यात आला. सन २००२ मध्ये श्री स्वामींचे नवीन जन्मस्थान बांधण्यात आले. महाप्रसादासाठी अन्नपूर्णा भवन बांधण्यात आले. २००७ या वर्षी श्रीं च्या जन्मस्थानाजवळ वेदपाठशाळा आणि पुजा-यांच्या निवासासाठी इमारत तसेच यती महारांच्या निवासासाठी कुटी बांधण्याचा संकल्प विश्वस्त मंडळाने घेतला. तो श्री स्वामी महाराजांच्या कृपेने आणि आपल्या सारख्या दानशूर भक्तांच्या सहकार्याने पूर्ण होत आला आहे.

महाराजांनी माणगांव सोडलेनंतर तसेच समाधिस्त झालेनंतर महाराज माणगांवात चैतन्यरुपाने आहेत. श्री क्षेत्र माणगांवी येणा-या, मनोमनी सेवा करणा-या, प्रसंगी धावा करणा-या भक्तांना महाराज प्रचिती देत आहेत. छोटे छोटे नदीनाले ज्याप्रमाणे समुद्राला येऊन मिळतात. त्याचप्रमाणे महाराजांचे जन्मस्थान हे दत्तसंप्रदायाचे मूळ स्त्रोत आहे. आज सर्व संतमहंत, विद्वान लोक दर्शनासाठी माणगांवी येत आहेत.

सर्वेपि सुखिन: सन्तु सर्वे सन्तु निरामय: ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित्दु:खमाप्नुयात ।।

श्री दत्तात्रये चरणारविंदयो: निरुपितास्तु ।।