श्रीस्वामींचे लिखित साहित्य हा अर्वाचीन काळातील चमत्कारच आहे. शंकराचार्यानंतर इतकी विपुल ग्रंथसंपदा थोरल्या महाराजांनीच निर्माण केली आहे. भारतीय तत्त्वज्ञान, चिंतन व ध्येयवादीची पताका त्यांच्या लिखित साहित्य रूपाने झळकत आहे. त्यावर अनेक प्रबंध तयार होतील. अशी त्यांची व्याप्ती व श्रेष्ठता आहे. ‘उत्तरेस जा’ या आज्ञेवरून संपूर्ण भारतामध्ये विविध ठिकाणी त्यांचा अनवाणी पायी प्रवास झाला. या काळात त्यांनी २३ चातुर्मास पूर्ण केले. विविध ग्रंथांची, स्तोत्रांची, आरती व्रतवैकल्ये, पदे आदींची श्रीदत्त महाराजांच्या कृपेने निर्मिती झाली. असे हे स्वामी महाराज संन्यासाश्रमाचा आदर्श, मूर्तिमंत वैराग्य, एकांतिक दत्तभक्ती, आयुष्यभर सगुणोपासना करणारे, उत्तम वैद्य, मंत्रसिद्धी, यंत्रतंत्र सिद्धियुक्त, उत्कृष्ट ज्योतिषी, मराठी व संस्कृत अध्यात्मिक साहित्य निर्मितीकार, प्रतिभावान व परतत्त्वस्पर्शी सिद्धकवी, उत्कृष्ट वक्ता, सिद्ध हठयोगी व उत्कट दत्तभक्त होते.

‘हे मी लिहिले’ असे त्यांनी कधीही म्हटले नाही. मला अक्षरे जशी समोर दिसतात, तशी मी कागदावर उतरवून घेतो असे ते सांगत. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराजांनी विपुल ग्रंथसंपदा निर्माण केली. गुरुचरित्राचे संस्कृत रूपान्तर (‘गुरुसंहिता’), दत्तविषयक पौराणिक सामग्रीचा उपयोग करून आणि आपले विचार त्यांत प्रसंगौचित्याने ग्रंथित करून लिहिलेले संस्कृत ‘दत्तपुराण’, सामान्यजनांसाठी मराठीत लिहिलेले ओवीबद्ध ‘दत्तमाहात्म्य’, जीवनाच्या अवस्थात्रयीचे नियमन करण्यासाठी लिहिलेले ‘शिक्षात्रय’ (कुमारशिक्षा, युवाशिक्षा आणि वृद्धशिक्षा), ‘सप्तशती गुरुचरित्र’ (मराठी : ओवीबद्ध), ‘माघमाहात्म्य’ (मराठी : ओवीबद्ध), स्त्री-शिक्षा (संस्कृत) इत्यादी ग्रंथ आणि शेकडो संस्कृत व मराठी स्तोत्रे एवढा त्यांच्या रचनेचा व्याप आहे. चार-पाच हजार पृष्ठांचा हा प्रचंड ग्रंथसंभार स्वामींच्या दत्तभक्तीचे, धर्मनिष्ठेचे, प्रगाढ चिंतनशीलतेचे आणि लोकोद्धाराच्या तळमळीचे प्रत्यंतर घडवत आहे.

वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथ वाड्मयात ‘द्विसाहस्री गुरुचरित्र’, ‘त्रिशती काव्यम्’, ‘सप्तशती’, ‘समश्लोकी (एकूण श्लोकसंख्या सात हजार) ‘दत्तपुराण’ (संस्कृत श्लोक ४५00), ‘दत्तमाहात्म्य’(मराठी ओवीबद्ध ३५00 ओव्या), स्वतंत्र ‘दत्तपुराण बोधिनी टीका’ (गद्य), ‘त्रयशिक्षाग्रंथ’ म्हणजेच कुमारशिक्षा, युवाशिक्षा आणि वृद्धशिक्षा हे तीन संस्कृत व ‘स्त्रीशिक्षा’ हा मराठी लघुग्रंथ, ‘कृष्णालहरी’, ‘नर्मदालहरी’ हे लहरीकाव्य लघुग्रंथ, ‘दकारादि दत्तात्रेय सहस्रनाम मंत्रगर्भ स्तोत्रम्’ हा लघुग्रंथ, ‘दत्तचंपु’ हा छंदशास्त्रावर आधारित ग्रंथ, ‘पंचपाक्षिकम’ हा प्रश्नज्योतिषावर आधारित ग्रंथ, ‘समश्लोकी चुर्णिका’ ग्रंथ आणि ‘कूर्मपुराण भाष्य’ अशी अद्भुत ग्रंथरचना दिसून येते. याशिवाय स्वामी महाराजांनी सत्यनारायण पूजेसारखी दत्तपुराण व मार्कण्डेय पुराण इत्यादींचा आधार असलेली ‘सत्यदत्तपूजा’ आणि ‘दत्तात्रेय षोडशावतार’ या लघुग्रंथांची निर्मिती करून ती दत्तोपासकांत रूढ केली.

त्यांची “करुणात्रिपदी” ही अजरामर रचना जवळपास सर्व दत्तभक्त रोजच म्हणतात. त्यांच्या प्रकांड विद्वत्ता आणि विलक्षण बुद्धिमत्तेचे लोभस दर्शन त्यांच्या विविध ग्रंथांमधून आपल्याला होते. ते अतिशय उत्तम ज्योतिषी आणि आयुर्वेदिक औषधांचे जाणकार म्हणूनही प्रसिद्ध होते. संस्कृत आणि मराठी अशा दोन्ही भाषांमधून अत्यंत सहज, ऐटबाज संचार करणारी त्यांची अद्भुत प्रतिभा भल्या-भल्या पंडितांना तोंडात बोटे घालायला लावणारी आहे. त्यांनी रचलेले “श्रीदत्तमाहात्म्य, सप्तशती गुरुचरित्रसार, दत्तलीलामृताब्धिसार, त्रिशती गुरुचरित्र, द्विसाहस्री गुरुचरित्र, श्रीदत्तपुराण”, यांसारखे ग्रंथ तसेच अत्यंत भावपूर्ण अशी शेकडो स्तोत्रे ही श्रीदत्तसंप्रदायाचे अलौकिक वैभवच आहे ! त्यांनी रचलेली पदे, अभंग त्यांच्या परम रसिक अंत:करणाचा प्रत्यय देतात. ते अतुलनीय भाषाप्रभू तर होतेच शिवाय त्यांची स्मरणशक्ती देखील अफलातून होती. पण मनाने अत्यंत भावूक आणि अनन्यशरणागत असे ते एक थोर भक्तश्रेष्ठही होते ; हेच त्यांच्या अतिशय विलोभनीय, भावपूर्ण रचनांचे खरे रहस्य आहे. त्यांचे अभंग वाचताना डोळे पाणावतात. प. प. श्री. टेंब्येस्वामींच्या वाङ्मयाचे फार मोठे वेगळेपण म्हणजे त्यांची मंत्रगर्भ रचना. ते एकाच स्तोत्रात खुबीने अनेक मंत्र गुंफत असत. श्रीदत्तात्रेय अष्टोत्तरशतनाम स्तोत्रामध्ये त्यांनी केवळ चोवीस श्लोकांमध्ये चौदा वेगवेगळे मंत्र गुंफलेले आहेत. त्यासाठी त्यांनी स्वत:च श्रीदत्तप्रभूंची नवीन नावे तयार केलेली दिसून येतात, इतकी त्यांची बुद्धिमत्ता प्रगल्भ होती. त्यांनी श्रीदत्तमाहात्म्याच्या शेवटच्या तीन अध्यायांतील ओव्यांमधून मांडुक्य व ईशावास्य ही दोन उपनिषदे देखील गुंफलेली आहेत. अशाप्रकारची अलौकिक व अपूर्व रचना हे श्री. टेंब्येस्वामींच्या वाङ्मयसागराचे वैशिष्ट्यच आहे! प. प. श्री. टेंब्येस्वामींनी संपूर्ण भारत देश पायी फिरून सनातन वैदिक धर्माला आलेली ग्लानी दूर करून धर्माची पुनर्स्थापना केली. त्यांचे कार्य इतके अद्भुत आहे की, त्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. श्रृंगेरी पीठाचे तत्कालीन शंकराचार्य श्रीमत् सच्चिदानंद शिवाभिनव भारती महास्वामींनी उपस्थितांना प. प. श्री. टेंब्येस्वामी महाराजांची ओळख “गुप्तरूपातील भगवान श्रीमद् आद्य शंकराचार्य” अशीच करून दिली होती व हीच वस्तुस्थिती आहे. ते साक्षात् भगवान श्रीशंकराचार्यच होते.

श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराज यांनी निर्माण केलेली ग्रंथसंपदा व स्तोत्रे

 1. द्विसाहस्त्रीश्रीगुरुचरितम्सटीकम् (मूळ १८८९) – माणगांव, महाराष्ट्र
 2. चूर्णिका (टीका १८९९) – प्रभास व द्वारका, गुजरात.
 3. श्रीदत्तपुराण (संस्कृत) (१८९२) – ब्रम्हावर्त, उत्तरांचल
 4. नर्मदालहरी (१८९६) – हरिद्वार, उत्तरांचल
 5. श्रीदत्तलिलामृताब्धिसार (मराठी) (१८९७) – पेटलाद, मध्यप्रदेश
 6. कूर्मपुराणाचे देवनागरीत लिप्यंतर (१८९८) – तिलकवाडा, गुजरात
 7. अनसूया स्तोत्र (१८९८) – शिनोर, गुजरात
 8. श्रीदत्तपुराण टीका (१८९९) – सिद्धपूर, गुजरात
 9. श्रीदत्तमाहात्म्य व त्रिशति गुरुचरित्र (मराठी) (१९०१) – मपत्पूर, मध्यप्रदेश
 10. समश्लोकी गुरुचरित्र (१९०३) – ब्रम्हावर्त, उत्तरांचल
 11. लघुवासुदेव मननसार (मराठी) (१९०३) – ब्रम्हावर्त, उत्तरांचल
 12. सप्तशतिगुरुचरित्रसार (मराठी) (१९०४) – ब्रम्हावर्त, उत्तरांचल
 13. श्रीकृष्णालहरी (५१श्लोक) (१९०५) श्रीगुरुस्तुति- स्तोत्र – गाणगापूर, कर्नाटक
 14. दत्तचंपू व करुणात्रिपदी (१९०५) – नरसी, महाराष्ट्र
 15. दव्यर्थीषडाननस्तोत्र व कुमारशिक्षा (१९०७) – हंपी, कर्नाटक
 16. शिक्षात्रयम् (संस्कृत) युवाशिक्षा (१९०८) – मुक्त्याला, आंध्रप्रदेश
 17. वृद्धशिक्षा (१९०८) – मुक्त्याला, आंध्रप्रदेश
 18. गुरुसंहिता (समश्लोकी गुरुचरित्र) (१९०७) – तंजावर, आंध्रप्रदेश
 19. स्त्रीशिक्षा (मराठी) (१९०८) – मुक्त्याला, आंध्रप्रदेश
 20. गंगेची स्तुती (१८९६) – हरिद्वार, उत्तरांचल
 21. नर्मदा स्तुती – नेमावर, मध्यप्रदेश
 22. अभंग-मित्रमित्रभांडती. – चिखलदा, मध्यप्रदेश
 23. सिद्धसरस्वती स्तुती – सिद्धपूर, गुजरात
 24. कृष्णावेणीपंचगंगा स्तोत्र – मंडलेश्वर, मध्यप्रदेश
 25. अखंड आत्मा अविनाशी दत्त स्तोत्र – गाणगापूर, कर्नाटक
 26. साकारता स्तोत्र (१९०६) – बडवानी, मध्यप्रदेश
 27. कृष्णालहरीसंस्कृत टिका – तजांवर, तमिळनाडू
 28. गोदावरी स्तुती – सप्तगोदावरी,आंध्रप्रदेश
 29. वैनगंगा स्तोत्र (१९०९) – पवनी, महाराष्ट्र
 30. भूतपिशाच स्तोत्र – गुर्लहोसूर, कर्नाटक
 31. तुंगभद्रास्तुती, त्रिपुरांतकेश्वर स्तोत्र (१९१०) – हावनुर, कर्नाटक
 32. षट्पंचशिकावेदान्तपर स्तोत्र – हरिहर, कर्नाटक
 33. दत्तमहात्मन स्तोत्र – जैनापूर, कर्नाटक
 34. श्रीपादश्रीवल्लभ स्तोत्र (१९११) – कूरवपूर, कर्नाटक
 35. जगदंबास्तुती – तुळजापूर, महाराष्ट्र