“श्रीं” चा पालखी सोहळा श्री दत्तमंदिरच्या स्थापनेपासून सुरु आहे. स्वामींच्या वेळी दर गुरुवारी व शनिवारी पालखी निघत असे. श्री गुरुप्रतिपदा ते वैशाख पौर्णिमेपर्यंत पालखी सोहळा असतो. पालखी दर पौर्णिमेला व अन्य उत्सवांना काढली जाते. तसेच भक्तांच्या आग्रहाखातर योग्य धार्मिक शुल्क कार्यालयात भरुन शुभदिनी देखील पालखी सोहळा साजरा केला जातो.

ब्रह्मवृंदामार्फतच सोवळ्यात फुलांनी सजविलेली पालखी आणली जाते. आरतीनंतर दत्तमंदिरासमोरच पालखी खाली ठेवली जाते. पुजारी आरती नंतर उत्सवमूर्ती आणून पालखीत ठेवतात. त्यानंतर जयघोषात पालखी उचलून ब्रह्मवृंदामार्फत पुढे नेली जाते. एकूण तीन प्रदक्षिणा दत्तमंदिरात होतात. प्रत्येक प्रदक्षिणेत पाच ठिकाणी पालखी थांबते. प्रत्येक थांब्याच्या ठिकाणी पदे म्हटली जातात. तसेच एका थांब्यावरुन दुस-या थांब्यापर्यंत चालतांना अष्टके व जयघोष म्हटला जातो.

सर्वात शेवटी पालखी ३/५ (तिसरी प्रदक्षिणा / पाचवा थांबा ) थांब्यानंतर औदुंबरापाशी येते. त्यावेळी अष्टके पूर्ण केली जातात. औदुंबराची आरती म्हणून नंतर उत्सवमूर्ती तेथूनच गर्भगृहात नेली जाते. पालखीमात्र तशीच पुढे नेऊन उत्तर दिशेला ठेवली जाते.
असा पालखी सोहळा आरतीनंतर रात्री ७.१५ ते ९.१५ पर्यंत अत्यंत उत्साहात शांत व धीरगंभीरपणे साजरा केला जातो. आरतीनंतर मंत्रपुष्प म्हटला जातो. त्यानंतर तीर्थप्रसाद होऊन पालखी सोहळा संपन्न होतो.