श्री प. प. वासुदेवानंद सरस्वतींचे मूळ नाव टेंब्ये. श्रावण कृष्ण पंचमी शके १७७६ (दि.१३/०८/१८५४) रोजी आजच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी जवळ असणा-या माणगांव येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील गणेशशास्त्री हे मोठे दत्तभक्त होते. त्यांचे बरेचसे वास्तव गाणगापुरात असे. त्यामुळे बालवयापासून ते आजोबांच्या सान्निध्यात असत. त्यांच्याकडून त्यांनी संस्कृतचे प्राथमिक शिक्षण घेतले. आठव्या वर्षी उपनयन संस्कार झाल्यावर प्रातःसंध्या, सायं संध्या, गुरुचरीत्र वाचन नियमितपणे सुरु झाले. वेदमूर्ती तात्याभटजी उकिडवे यांच्याकडे वेदाध्ययन सुरु झाले. एवढया लहान वयातही ते स्वतः सोवळ्याने वेदाध्ययन व भात करुन नैवेद्य,वैश्र्वदेव करीत असत. आचारः प्रथमोधर्मः याचे जणू ते मूर्तीमंत उदाहरणच होते.

पौरोहीत्य हा त्यांचा उदरभरणाचा व्यवसाय होता. त्या निमित्ताने त्यांचे धर्मविधी व धर्मशास्त्रविषयक अध्ययन पूर्ण झाले. पण ते त्यांचे जीवितकार्य नव्हते, यथाकाल त्यांनी गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला आणि यथाशास्त्र त्याचे पालन केले. त्यांच्या शास्त्रशुदध आचरणाने त्यांनी मंत्रसिध्दी अवगत होत्या, त्याव्दारे ते इतरांची संकटे, दुःखे दूर करीत, लोकांना सन्मार्गाला लावीत.

दत्तप्रभूंच्या दृष्टांन्तानुसार ते प्रथमच नरसोबाच्या वाडीस गेले. तेथे साक्षात श्री.प.प.नृसिंह सरस्वतींनी त्यांना दर्शन दिले. वाडीतच राहणा-या श्रीगोविंदस्वामींनी त्यांना श्री दत्तोपासना करण्यास सांगीतले. त्याच दिवशी प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयांनी त्यांना मंत्रोपदेश दिला. त्यापूढेच स्वामींचे सर्व आयुष्य म्हणजे केवळ श्री दत्तात्रेयांच्या आज्ञेने विकसित झालेले ब्रम्हकमळच सा-यांच्या आयुष्यात सुगंध पसरविणारे.

आपण सात वर्षे माणगांवतच राहू असे श्रीदत्तात्रेयांनी सांगीतल्यामुळे स्वामी वाडीहून माणगावांस येण्यास निघाले. वाटेत त्यांनी कागलहून एक पितळेची छोटी, सात बोटे उंचीची व्दीभुज, वराभयकर, सिध्दासन घातलेली दत्तमूर्ती आणली. माणगावला पोहोचल्यावर एक मंदीर बांधून तिची प्रतिष्ठापना केली. श्रीस्वामींच्या वास्तव्यामुळे माणगांव हे हळूहळु तीर्थक्षेत्र होऊ लागले. गुरुव्दादशी, श्रीदत्तजयंती हे उत्सव मोठया उत्साहाने थाटात साजरे होऊ लागले निर्मला नदीचे नांव पूर्वी कर्ली नदी होते. एकवेळ वासुदेव शास्त्री नदी पलीकडील गावांत गेले असतां परत येतांना स्त्रीच्या रुपाने प्रत्यक्ष नदी श्री टेंब्येस्वामींच्या समोर उभी राहीली व माझे नामकरण केल्याशिवाय मी आपणांस पुढे जाऊ देणार नाही असे सांगितले व तेव्हा त्यांनी या नदीचे नाव निर्मला असे ठेविले. तेव्हापासून ही नदी निर्मला नदी म्हणून प्रसिद्ध झाली. अशा या श्री निर्मला मातेचे स्मारक म्हणून श्री निर्मला मातेचे मंदीर नदीवर बांधून तिच्या मूर्तिची प्रतिष्ठापना करण्याचे विश्वस्त मंडळाने ठरविले आहे.

यथाकाल त्यांच्या पत्नी सौ.अन्नपूर्णाबाई गर्भवती झाल्या आणि एक दिवस देवांनी श्री स्वामींना माणगांव सोडण्याची आज्ञा केली. त्याबरोबर पंचायतनाचे संपुट,देवाची मूर्ती,एक तांब्या,एक धोतर आणि एक चोळी-लुगडे एवढ्याच साहित्यानिशी ती दोघे बाहेर पडली. शके १८११ (इ.स.१८८९) मध्ये त्यांनी माणगांव सोडले.या भूमीला स्वामींचा पदस्पर्श मात्र पुन्हा लाभला नाही.

माणगांव सोडल्यावर उभयता वाडीला आले. थोडयाच दिवसांत सौ.अन्नपूर्णाबाई प्रसूत झाल्या. पण मुलगा मृतवस्थेत जन्मला. संसाराचा पाश तोडणारी एक घटना. अधीच स्वभावाने विरक्त असलेले स्वामी अधिकच विरक्त बनले. श्री दत्तप्रभूंनी वाडी सोडून उत्तरेकडे जाण्याची आज्ञा केली. मजल दरमजल करीत मंडळी गोदातीरी असलेल्या गंगाखेडला पोहोचली आणि सौ. अन्नपूर्णाबाईंची प्रकृती बिघडली. स्वामींनी त्यांची खूप सेवा केली. परंतु यश आले नाही. आजपासून चौथ्या दिवशी तुम्हांला दोघांनाही नेण्याकरीता आम्ही येऊ असा दृष्टांत झाला. त्यावर अजून मला संन्यास घ्यावयाचा असल्याने मी येणार नाही असे श्री स्वामींनी निक्षून सांगीतले. दृष्टांतानुसार चार दिवसांनी, शके १८१३ वैशाख शुद्ध चतुर्दशीला त्या साध्वीचा आत्मा अनंतात विलीन झाला. तेरा दिवसापर्यंत पत्नीचे सर्व औध्वर्दहीक विधी संपले आणि लगेचच ‘अनाश्रमी न तिष्ठेत’ या शास्त्र वचनानुसार स्वामींनी संन्यास ग्रहण केला.

श्री स्वामीमहाराजांकडे ऐहिक जीवनाकडे फारसे लक्ष नव्हते. परंतु कर्तव्यभावना अणि भक्ती यांच्या जोरावर त्यांनी आपल्यावरील जबाबदा-या अतिशय शांतचित्ताने पार पाडल्या. त्यांचे हे पूर्वायुष्य म्हणजे पुढील आध्यात्मिक आयुष्य़ाची पूर्वतयारीच होती. यानंतरच्या आयुष्यात खडतर तपश्चर्या, साधना, योगाभ्यास करीत ते साधकावस्थेप्रत पोहोचले.

उज्जयिनी येथे श्री प. पू. नाराणानंद सरस्वती नावाचे स्वामी आहेत. त्यांच्याकडे जाऊन दंड घ्यावा अशी श्री दत्तप्रभूंची आज्ञा झाली. श्री. प. प. नारायणनंद सरस्वती हे श्री. प. प. नृसिंह सरस्वतींच्या वंशातील होत. दण्डग्रहणानंतर स्वामींचा पहिला चातुर्मास उज्जयिनी येथेच झाला. स्वामींच्या जीवनांत एकूण २३ चातुर्मास झाले. या सर्व काळात ते भारताची हिमालयापासून रामेश्वरापर्यत, अखंड पदयात्रा करीत हींडत होते. फक्त चातुर्मासातच ते एके ठिकाणी रहात. त्यावेळी लोकांना शास्त्रीय विषय समजावून देत. संध्याकाळच्या अनुष्ठानानंतर पुराण सांगत. महाराजांची प्रवचन शैली उत्कृष्ठ होती. सर्व विषय समप्रमाण, सोपपत्तिक पटवून देत. या अखंड पायी प्रवासातच त्यांनी सगळीकडे श्री दत्तभक्तीचा प्रसार केला. अनेक शिष्य तयार केले. मंदीरे बांधली, दैवी वाड्मयाची निर्मिती केली.

शके १८३५ च्या चैत्र महिन्यात नर्मदाकाठी असलेल्या गरुडेश्वरला ते पोहोचले. येथून आता कोठे जाणे होणार नाही, असे त्यांनी बरोबरच्या लोकांना सांगितले. शके १८३६ च्या वैशाखात त्यांची प्रकृती बिघडली. शरीर क्षीण होऊ लागले. आषाढ शुद्ध प्रतिपदेला गीतेत वर्णन केलेल्या योग्याच्या निर्याणानुसार, सिध्दासन घालून, श्वास निरोध करुन, दीर्घ प्रणवोच्चार करीत स्वामींनी देहविसर्जन केला. स्वामीमहाराज परब्रह्मी विलीन झाले. श्री दत्तब्रह्माशी एकरुप झाले.

भारताचा हा लाडका गुणी पुत्र. महाराष्ट्रातील श्री निर्मलेच्या तीरावर जन्मला, कृष्णेच्या तीरावर श्री नृसिंहवाडीच्या देवभूमीत वाढला आणि गुजरातमधील श्री नर्मदेच्या तीरावर विसावला.

आयुष्यभर शास्त्रशुद्ध आचरण करुन स्वामींनी लोकांना आर्दश जीवनाचे प्रत्यक्ष उदाहरण दाखवले हे तर खरेच, पण श्रीस्वामीमहाराजांचे नांव अजरामर करणारे त्यांचे कार्य म्हणजे त्यांनी केलेली वाड्मय निर्मिती, संस्कृत आणि मराठी या दोन्ही भाषांतून त्यांनी रचना केली आहे. दत्तपुराण,दत्तमहात्म,व्दीसाहस्त्री हे ग्रंथ साधक-उपासक-संशोधक सर्वांच्याच दृष्टीने अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त ग्रंथ आहेत. आपण सर्वांचे महदभाग्य आहे की हे सर्व वाड्मय एकत्र करुन, त्यांचे शिष्य प. पू. श्री गुळवणी महाराज यांनी स्वामींच्या जन्मशताब्दीच्या वर्षात, एकूण १२ खंडात प्रसिद्ध केले. स्वामींच्या नावे स्थापन केलेल्या प.प.श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज प्रबोधिनी या संस्थेतर्फे त्यांच्या वाड्मयाचे विविध भाषात भाष्यांतरे करुन,ग्रंथाचे पुनर्मुद्रण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

स्वामींचे वाड्मय आणि कार्य पाहता विसाव्या शतकातील शंकराचार्य असेच त्यांचे वर्णन करावे लागेल. श्री शंकराचार्य प्रणीत अव्दैत वेदान्त हाच श्री स्वामींच्या वाड्मयाचा मूलाधार आहे. अव्दैत वेदान्त व श्री दत्त संप्रदाय यांचा समन्वय साधण्याचे फार मोठे कार्य स्वामींच्या वाड्मयाने केले आहे. स्वामींचे व्दीसाहस्त्री ग्रंथावरील भाष्य हे श्री शंकराचार्यांच्या ब्रह्मसूत्रावरील भाष्याची आठवण करुन देणारे आहे. स्वामींच्या स्तोत्र वाड्मयावर तर आचार्यांचा खूपच प्रभाव आहे. श्रीशंकराचार्य आणि श्री स्वामी दोघेही संन्यासी, पण त्यांनी कर्मसंन्यास घेतलेला नाही. उलट आपल्या आचरणाने त्यांनी प्रेम आणि सेवा यांचा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. संन्यास मार्ग स्वीकारुन मोक्ष आणि कर्म यांचा समन्वय घालून जीवन जगणाऱ्या या यतिवरांना भारतीय समाजाच्या मनात मानाने, आदराचे स्थान आहे.

प. पू. श्री गुळवणीमहाराज, नारेश्र्वरचे श्रीरंगावधूत, श्री प. पू. नृसिंहसरस्वती दीक्षितस्वामी महाराज, श्री प. पू. गांडामहाराज, श्री सीतारामशास्त्री टेंब्ये महाराज, श्री पंडीत महाराज क्षिप्रीकर, श्री नाना महाराज तराणेकर ही स्मामींची प्रमुख शिष्य मंडळी. यांना गुरुस्थानी मानणारा मोठा शिष्यवर्ग आणि भारतात सर्वत्र आणि भारताबाहेरही आहे. त्यांच्या दृष्टीने स्वामी हे “गुरुणांगुरुः – परमगुरु ( थोरले )” आहेत.